गीतावाचस्पती सदाशिवशास्त्री भिडे यांनी, त्याकाळी दक्षिण भारतातील, हैद्राबादपासून ते उत्तरेस सिंध हैद्राबादपर्यंत, स्वतः दौरे करून, गीताधर्म मंडळाचा प्रसार केला. तसेच १९२५ या वर्षी हैद्राबाद येथे भरलेल्या, हिंदू धर्म परिषदेत, भिडेशास्त्री यांनी, मार्गशीर्ष शुध्द एकादशी ही गीताजयंती आहे, असा ठराव मांडला. सदाशिवशास्त्री भिडे यांनी, अविश्रांतपणे केलेल्या दौ-यातून प्राप्त झालेल्या पै-पैशांतून स्वतः भिडेशास्त्री, यांनी गीताधर्म मंडळाचा आर्थिक पाया घातला. स्वतः भिडेशास्त्री हिशोबाच्या बाबतीत इतके काटेकोर होते की, भोजन प्रसंगी मिळालेली दक्षिणाही, त्यांनी मंडळाच्या निधीत जमा केली. शास्त्रीबुवा स्वतः अंध होते, तरी त्यांनी आपल्या प्रज्ञाचक्षूतून, मंडळाच्या स्वतःच्या स्वतंत्र वास्तूचे स्वप्न, पुनःपुन्हा पाहिले होते. सुदैवाने आज, मंडळाची स्वतःची भव्य वास्तू, श्रीयोगेश्वराच्या कृपेने, आकारास आलेली आहे. वास्तुमागे प्रांगण सभागृहही आहे.

अशा या गीताधर्म मंडळाचे संस्थापक कार्यवाह म्हणजे ‘केसरी’ चे भूतपूर्व संपादक, पत्रकार महर्षी श्री. ग. वि. केतकर हे, लोकमान्य टिळक यांचे नातू होत. ते स्वतः श्रीमद् भगवद्गीता या ग्रंथाचे अभ्यासक आणि उपासक होते. श्रीमद् भगवद्गीता – या एकाच विषयावर, जास्तीत जास्त वृत्तपत्रीय लेखन, त्यांनी केले. असे लक्षात येते की, भारतीय भाषांमध्ये, गीता या विषयांवर इतके विपुल लेखन, अन्य कोणी केले नसावे. गीताधर्म मंडळाच्या स्थापनेनंतर म्हणजे १९२४ नंतर गीताधर्म मंडळाच्या वाढीसाठी, भारतभर दौरा करण्याची आणि यातून प्रचाराची जबाबदारी स्वतः श्री. सदाशिवशास्त्री भिडे यांनी उचलली, तर थोर पत्रकार श्री. ग. वि. केतकर यांनी अनेक वृत्तपत्रांतून, गीताविषयक लेखन करून, गीताधर्म मंडळाच्या, स्वीकृत कार्याचा उदंड प्रचार केला. तसेच त्यांनी विविध विद्यालयांतुन, गीता पाठांतराच्या स्पर्धा आयोजित केल्या. मार्गशीर्ष शुध्द एकादशी हा दिवस गीताजयंती म्हणून साजरा केला जावा, यासाठी श्री. ग. वि. केतकर यांनी प्रचंड पत्रव्यवहार केला. भाग्याची गोष्ट अशी की, आता हा दिवस गीताजयंती म्हणून, भारतात सर्वत्र साजरा केला जातो आहे, याचे विनम्र श्रेय, गीताधर्म मंडळ या संस्थेला आहे. या पुढे ही तिथी आंतरराष्ट्रीय ‘गीता जयंती – दिन’ म्हणून साजरी व्हावी असे मंडळाचे स्वप्न आहे.

९ डिसेंबर १९३९ या दिवशी, मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष सदाशिवशास्त्री भिडे यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मंडळाच्या कार्याची धुरा, श्री. ग. वि. केतकर यांच्या एकट्याच्या खांद्यावर पडली. त्या स्थितीत श्री. नगरकर, श्री. भिडे आणि अन्य काही कार्यकर्ते यांच्या सहकार्याने, श्री. ग. वि. केतकर यांनी सन १९४० ते १९५८ या कालखंडामध्ये मंडळाचे कार्य जोमाने चालू ठेवले. या कालावधीत, प्रतिवर्षी विविध शिक्षण संस्थांतून, गीताविषयक परीक्षाही घेण्यात येत असत. पुढे श्री. केतकर यांच्या अगत्याच्या आवाहना प्रमाणे, प्रख्यात संघयोगी समाजधुरिण श्री. विनायकराव गो. आपटे यांनी सन १९५९ पासून, गीताधर्म मंडळाच्या कार्यवाहपदाची आणि गीताधर्म मंडळाच्या सर्वांगीण वाढीची जबाबदारी स्वीकारली. श्री. विनायकरावांचा, श्रीमद् भगवद्गीतेचा अभ्यास मोठा होता. ते गीतातत्व प्रचारार्थ, गावोगावी व्याख्यानेही देत असत. सन १९६० ते १९६७, या त्यांना लाभलेल्या अत्यंत अल्प कालावधीत,  मंडळाच्या कार्याला प्रचंड वेग, श्री. विनायकराव आपटे यांनी दिला.

अशा तऱ्हेने प्रतिवर्षी विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारे नियमित संस्कारवर्ग, तसेच गीताजयंती महोत्सव आणि प्रसंगानुरूप काही व्याख्यानमालांचे आयोजन, अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमांतून, गीताधर्म मंडळाच्या कार्याला मोठी गती देण्याचे काम या कालावधीत झाले. याच कालखंडात कै. सदाशिवशास्त्री भिडे संपादित श्रीमद् भगवद्गीता पाठ्यावृत्तीचे प्रकाशन झाले. असे दिसते की श्री. विनायकरावांच्या प्रयत्नांमुळे श्री बाळासाहेब साठे, श्री. रा. श्री. जोशी, श्री. वामनराव आठवले, श्री. नाथ खरे इत्यादी कार्यकर्त्यांचा एक संच, मंडळाच्या कार्यात सहभागी झाला. गीताधर्म मंडळाचे कार्य खूप वाढले. मंडळाचे नाव सर्वतोमुखी झाले. दुर्दैवाने संघयोगी विनायकराव आपटे यांचे निधन जानेवारी १९६७ मध्ये झाले पण कै. विनायकराव आपटे यांच्या कार्यवाह पदाच्या कालावधीत म्हणजे १९६६ मध्येच पुणे येथील वाडिया कॉलेजचे प्राचार्य आणि प्रसिध्द गीताभ्यासक श्री. माधव गंगाधर महाजन यांनी मंडळाचे अध्यक्षस्थान स्वीकारले. त्यांनी सन १९६६ ते १९८३ या कालखंडात अध्यक्षपद भूषविले. या कालावधीत मंडळाच्या कार्याला सर्व क्षेत्रांमध्ये गती मिळाली. याच कालखंडात मंडळाच्या ‘गीतादर्शन’ या मासिकाची (सन १९७० मध्ये) सुरूवात झाली. तसेच पुण्याच्या सदाशिव पेठेच्या मध्यवस्तीत, १०,००० चौरस फुटाची वास्तू खरेदी केली गेली. या वास्तूत अंदाजे २५० श्रोते बसू शकतील एवढे पटांगणही होते.

इतिहासाची पृष्ठे चाळताना आणि गीताधर्म मंडळाची वाटचाल निरखताना लक्षात येते की, पुढील कालखंडात पी. डी. ए. या प्रसिध्द नाटयसंस्थेचे संस्थापक आणि भारतीय संस्कृतीचे अभ्यासक, श्री. भालबा केळकर यांनी गीताधर्म मंडळाचे अध्यक्षपद १९८३ ते १९८८ या कालखंडात भूषविले. त्यांनीच गीताधर्म मंडळात दैनंदिन ज्ञानसत्राचा अव्याहत उपक्रम (व्याख्याने/प्रवचने) सुरू केला. तो गेली तिसाहून अधिक वर्षे म्हणजे आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे.

नंतरच्या कालखंडात सेवानिवृत्त पोलीस कमिशनर आणि संस्कृतचे व्यासंगी अभ्यासक श्री. श्रीधर प. मराठे हे मंडळाचे अध्यक्ष झाले. (सन १९८८ ते १९९२) त्यांच्या कार्यकाळात, गीताधर्म मंडळाच्या नव्या इमारतीच्या १/३ भागाचे बांधकाम पूर्ण झाले. तसेच मंडळाच्या प्रकाशन-विभागातर्फे अनेक पुस्तके, श्री. मराठे यांच्या अध्यक्षीय कार्यकाळातच, प्रकाशित झाली. यानंतर सुप्रसिध्द संत-साहित्याभ्यासक आणि नामवंत लेखक प्राचार्य डॉ. हेमंत वि. इनामदार यांनी गीताधर्म मंडळाचे अध्यक्षपद भूषविले. (सन १९९३ ते १९९९) प्रतिवर्षी एका विषयावर सलग २१ दिवसांच्या व्याख्यानमालेचे आयोजन त्यांनी सात वर्षे केले. संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर, श्रीनामदेव, श्रीएकनाथ, श्रीतुकाराम, श्रीसमर्थ रामदास तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि श्रीमद् भगवद्गीता या विषयांवर महाराष्ट्रातील नामवंत वक्त्यांच्या व्याख्यानमालेचे नियोजन डॉ. इनामदार यांनी समर्थपणे केले. त्यांच्याच अध्यक्षीय कार्यकाळात ‘मराठी तत्त्वज्ञान महामंडळ’ (पुणे) या नामवंत संस्थेचे, गीताधर्म मंडळात विलीनीकरण झाले. नंतरच्या कालखंडात संतसाहित्याच्या ख्यातिप्राप्त अभ्यासक आणि प्रसिध्द प्रवचनकार डॉ. सौ. कल्याणी नामजोशी यांनी अध्यक्षपद भूषविले (सन १९९९ ते २०१०) यांच्या कार्यकाळात गीता – संथा वर्ग, दैनंदिन ज्ञानसत्र आणि प्रकाशन विभाग – या उपक्रमांना विशेष गती मिळाली. इ.स. २०१० पासून डॉ. मुकुंद र. दातार हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. डॉ. मुकुंद दातार हे निवृत्त प्राचार्य, ख्यातनाम वक्ते, तसेच संतसाहित्यविषयक अनेक ग्रंथांचे लेखक आहेत. सांस्कृतिक विचारवंत म्हणून त्यांची प्रसिद्धी असून, त्यांच्या कारकिर्दीत, गीताधर्म मंडळाची सर्वांगीण प्रगती लक्षणीय वेगाने होत आहे.

त्यामध्ये दैनंदिन ज्ञानसत्र, स्वाध्याय परीक्षा इ. आठ प्रकारचे उपक्रम सातत्याने आणि अधिक जोमाने चालविण्याबरोबरच त्यामध्ये पुढील गोष्टींचीही भर पडली.
१. चार हजार फुटांचे सुसज्ज खुले प्रांगण सभागृह
२. गीताभवनाच्या सुशोभीकरणासह स्वागतकक्ष आणि ग्रंथ-भांडार यांची निर्मिती
३. मंडळाच्या संदर्भ-ग्रंथालयातील ग्रंथांचे संगणकीकरण आणि इतर सुविधांची निर्मिती
४. बदलत्या काळानुरूप गीताधर्ममंडळाच्या नूतन घटनेची निर्मिती आणि स्वीकृती
५. इ.स. २०१४ पासून प्रतिवर्षी अखंडपणे संपूर्ण गीतापठण महायज्ञाचे आयोजन (सरासरी पंधराशे ते दोन हजार गीता पाठकांची उपस्थिती)
६. पुण्याच्या विविध वस्त्यांच्या मध्ये गीता-संस्कार-वर्ग
७. गीताधर्म मंडळाची वेब-साईट (संकेतस्थळ) याची इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत निर्मिती
८. गीतायोगी भिडेशास्त्री यांच्या समग्र चरित्र ग्रंथाचे प्रकाशन
९. गीतादर्शन या सांस्कृतिक मासिकाची सुवर्णमहोत्सवी स्मरणिका

मंडळाच्या अध्यक्ष्यांच्या या नामोल्लेखाप्रमाणे, मंडळाच्या कार्यवाह – सहकार्यवाहांचेही काम फार मोठे आहे. त्यात गीताधर्म मंडळाच्या वाढीसाठी अविरत प्रयत्न केलेले गीताधर्म मंडळाचे ध्येयनिष्ठ, निरलस आणि व्यवहारदक्ष कार्यकर्ते श्री. वसंतराव वि. आपटे यांनी सन २००९ पर्यंत मंडळाची ४२ वर्षे अखंडपणे सेवा केली. २० हून अधिक वर्षे ते मंडळाचे कार्यवाह होते. त्यांच्याच कार्यकाळात ‘गीताभवनाच्या भव्य वस्तूचे बांधकाम पूर्ण झाले. तसेच श्री. वसंतराव आपटे हे ‘गीतादर्शन’ मासिकाचे सलग ३७ वर्षे संपादक होते. त्याचप्रमाणे श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या वाड्.मयाचे अभ्यासक आणि समाजहितैषी प्राध्यापक डॉ. ग. वा. करंदीकर यांनीही सहकार्यवाह या नात्याने मंडळाची २० वर्षाहून अधिक काळ निरलस सेवा केली. अॅडव्होकेट श्री. ज्ञानेश बेंद्रे हे २००७ ते २०१५ पर्यंत कार्यवाह होते. तसेच श्री. सुहास आगरकर यांनीही सहकार्यवाह म्हणून मंडळाची सेवा केली. डॉ.मुकुंद दातार यांनी श्री. वसंतराव आपटे यांच्या सांगण्यावरून २००७ ते २०११ या कालावधीत गीतादर्शन मासिकाच्या संपादक पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. २०११ नंतर श्रीमती विनया मेहेंदळे या गीतादर्शन मासिकाच्या संपादिका असून त्या अनेक नवे उपक्रम राबवित आहेत.

अशा प्रकारे मंडळाची प्रगती स्वीकृत ध्येय मार्गाने आणि अखंडपणे होते आहे. यासाठी जनता जनार्दनाच्या आशीर्वादांची नितांत आवश्यकता आहे.